पुणे - दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही सर्वसामान्य नागरिकांना फराळ उपलब्ध व्हावा यासाठी दि पूना मर्चंट चेंबरच्या वतीने रास्त भावात लाडू व चिवडा विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर बाजार भावातील निम्म्यापेक्षा कमी किंमतीत चिवडा व बुंदीचे लाडू विक्री उपक्रमाची सुरुवात मागच्या बुधवारपासून करण्यात आली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा लाडूसाठी लागणाऱ्या काही वस्तूंच्या भावात वाढ झाली आहे. तरीसुद्धा यावर्षी लाडू आणि चिवड्याचे दर 144 रुपये प्रति किलो आकारण्यात येत आहे.
एक लाख किलो लाडू अन् एक लाख किलो चिवडा केला जातो तयार
सुमारे 33 वर्षांपूर्वी तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांसाठी काहीतरी करण्यासाठी पुण्यातील व्यापाऱ्यांना सुचवले होते. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरी हे फराळ बनवले जाते. मात्र, लाडू बनविण्याची प्रक्रिया क्लिष्ठ असल्याने अनेक जण लाडू विकतच आणतात. यामुळे दि पूना चेंबर ऑफ मर्चंटच्या वतीने ना नफा ना तोटा या तत्वावर लाडू व चिवडा उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यासाठी पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एक मेगा किचन तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी तब्बल एक लाख किलो लाडू व एक लाख किलो चिवडा तयार केला जातो. या उपक्रमाची नोंद लिम्काबूक ऑफ रेकॉर्ड व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडमध्येही झाली असल्याची माहिती चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबोले यांनी दिली.
साडे पाचशेहून अधिक कामगार करताहेत काम
दि पूना चेंबर ऑफ मर्चंटच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या लाडू, चिवडा विक्रीसाठीच्या या उपक्रमात सुमारे 550 हुन अधिक कामगार हे रात्रंदिवस काम करत आहेत. यात 350 महिला तर 200 पुरुषांचा समावेश आहे. हे काम तीन शिफ्टमध्ये चालतो.
शहरात चौदा ठिकाणी विक्री केंद्र
या फराळाची विक्री मार्केट यार्डातील व्यापार भवन, शंकर शेट रोडवरील ओसवाल बंधू समाज कार्यालय, कोथरूड येथील जयश्री ऑइल अॅण्ड शुगर डेपो, कर्वे नगर येथील अगरवाल सेल्स कॉर्पोरेशन व कोथळी सप्लाय कंपनी, एसपी कॉलेज समोरील नरेंद्र इलेक्ट्रिकल्स, सिंहगड रोडवरील भगत ट्रेडर्स व अर्बन बाजार, बिबवेवाडी येथील आझाद मित्र मंडळ, अरेणेश्वर येथील योगी रद्दी डेपो, पद्मावती नगर येथील व्ही. एन इंटरप्राईजेस, कसबा पेठ येथील श्री साई सामाजिक सेवा, चंदन नगर येथील पवन ट्रेडर, चिंचवड येथील श्रीराम जनरल स्टोअर, अशा 14 ठिकाणी सुरू राहणार आहे.
हे ही वाचा - Diwali 2021 : काय आहे धनत्रयोदशीच्या मागची पौराणिक कथा? जाणून घ्या...