पुणे - कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभावर आज 203 वा शौर्यदिन आज साजरा होत आहे. रात्री बारा वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर मानवंदना देण्यात आली. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित राहून विजय स्तंभाला मानवंदना दिली.
उपमुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार -
महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी आहे. आपली जनता अफवांवर विश्वास ठेवत नाही. विजय स्तंभावरील शौर्यदिन साजरा होत असताना कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा व्हावा, असे आवाहन महाविकास आघाडी सरकारने व प्रशासनाने केले होते. या आवाहनाला अनुयायांनी प्रतिसाद दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेचे आभार मानले.
विजयस्तंभाचा होणार विकास -
कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीला साजरा होणाऱ्या शौर्य दिनाला असंख्य नागरिक उपस्थित असतात. पुढील काळात या गर्दीचा विचार करून विजय स्तंभ परिसराचा विकास आराखडा तयार करण्याचा विचार महाविकास आघाडी सरकार करत आहे. त्यासाठी स्थानिक जमिनी आधीग्रहीतकरून त्यांना चांगला मोबदला दिला जाईल. मागील सरकारच्या काळात विजयस्तंभ विकास आराखडा घोषित झाला. मात्र, अजूनही निधी आला नसल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपाला चिमटा काढला.
सामाजिक गुलामगिरीतून मुक्त झाल्याचा दिवस -
1 जानेवारी हा दिवस म्हणजे सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे. पेशवाईच्या काळात जी काही अस्पृश्यता पाळली जात होती त्याच्या विरोधातील हा लढा होता. या लढ्याचे प्रतिक म्हणून 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला अनुयायांनी प्रतिसाद देऊन घरातूनच मानवंदना दिली. या गोष्टीचे प्रकाश आंबेडकर यांनी कौतुक करत अनुयायांचे आभार मानले.
अर्थव्यवस्था सुरळीत करण्यास सरकार अक्षम -
कोरोनाच्या परिस्थितीनंतर देश व राज्याची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे सक्षमता नाही. लोकांनी सुचवलेल्या गोष्टींवर केंद्र व राज्य सरकार निर्णय घेत आहे. मात्र, सरकारमध्ये कोरोना नंतरच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कुठल्याही उपाय योजना नसल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.
काय आहे कोरेगाव भीमाचा इतिहास -
पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर १ जानेवारी, १८१८ ला ब्रिटिश व पेशव्यांच्यामध्ये लढाई झाली होती. ब्रिटिशांच्या तुकडीत एकूण ८३४ सैनिक होते. त्यात ५०० महार समाजाच्या सैनिकांचा समावेश होता. तर, मराठ्यांच्या बाजूने २८ हजार सैनिक होते. त्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करत होते. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते. याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरूद्ध लढले आणि त्यांनी विजय मिळवला. या युद्धात पराभव झाल्याने पेशवाई व मराठा साम्राज्याचा अस्त झाला. कोरेगाव भिमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरली होती. या सैनिकांच्या सन्मानार्थ विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला महाराष्ट्रासह देशभरातून लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात.