पुणे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात केवळ पोकळ घोषणा केल्या. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण उद्धव ठाकरेंना टिकवता आले नाही. ज्या विद्यार्थ्यांची सरकारी नोकरीत निवड झाली, त्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत सरकारला नोकऱ्या देता आल्या नाहीत. उद्धव ठाकरे फक्त घोषणा करत आहेत. केवळ बोलण्यापेक्षा त्यांनी करून दाखवावे, अशी टीका शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी झालेल्या नोकर भरतीतील उमेदवारांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसंग्रामच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते. मेटे म्हणाले, आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी जानेवारी १९ ते मार्च २० या कालावधीत २० विभागांनी नोकरभरती प्रक्रिया राबवली. ९ तारखेला आरक्षणाला स्थगिती मिळाल्यावर सरकारने सर्व विद्यार्थ्यांना रुजू होण्यास नकार दिला. या विद्यार्थ्यांवर शासनाने घोर अन्याय केला आहे. असे साडेतीन ते चार हजार विद्यार्थी आहेत. काही शब्दांचे चुकीचे अर्थ काढून मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचे काम मंत्रालयातील काही मंत्री व प्रशासनातील काही अधिकारी करत आहेत. त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बळी पडत आहेत.
अशोक चव्हाणांचा दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न -
अशोक चव्हाण यांच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही, ते दुफळी निर्माण करण्याचे काम करत आहेत. याला मराठा समाजाने बळी पडू नये. सरकारने बैठक लावली नाही, तर राज्यपालांकडे जावे लागेल. त्यातूनही न्याय मिळाला नाही, तर शिवसंग्राम आझाद मैदानावर धरणे धरेल, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला.
हेही वाचा- भाव वधारल्याने चोरांची कांद्यावर नजर; जुन्नरमध्ये कांदा चाळीवर दरोडा