पुणे (पिंपरी-चिंचवड) - गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून एका आरोपीला शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, आरोपीने लघुशंकेच्या बहाण्याने चौकीतून पलायन करत थेट मेहुण्याचा विवाह सोहळा गाठल्याची घटना समोर आली. पोलिसांनी या आरोपीला भिवंडी येथून पुन्हा अटक केली आहे. मेहुण्याच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहायचे असल्याने आपण पळून गेल्याचे आरोपीने कबुल केले.
भिवंडीला केले पलायन -
करम होशियत अली शेख, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी शिरगाव येथे गुन्हा दाखल करून सामाजिक सुरक्षा विभागाने आरोपी करम शेख आणि त्याच्या साथीदाराला शिरगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस ठाण्यात असताना करम याने लघुशंकेचा बहाणा करून पलायन केले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने पलायन केल्याने पोलीस दलात एक खळबळ उडाली होती.
24 तासात आरोपीला केली अटक -
शिरगाव पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून २४ तासात आरोपी करम याला भिवंडी येथून पुन्हा ताब्यात घेतले. करम याच्या मेहुण्याचे लग्न असल्याने तो पळून गेल्याची त्याने पोलिसांना कबुली दिली आहे.
हेही वाचा - कोरोनाची दुसरी लाट; नव्या 43 हजार 183 रुग्णांचे निदान