पुणे - पुण्यात मागील वर्षी कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला झाला होता. या हल्ल्यात बँकेची जवळपास ९४ कोटी इतकी रक्कम लंपास करण्यात आली होती. या सायबर हल्ल्यामुळे तेव्हा देशभरात खळबळ माजली होती. यातील १० कोटींची वसुली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या हाँगकाँग बँकेत चोरट्यांनी ही रक्कम वळती केली होती. ती रक्कम बँकेने जप्त केली आहे. हीच रक्कम आता कॉसमॉस बँकेला पुन्हा परत मिळण्याची शक्यता आहे. बँकेचे अधिकारी आणि सायबर पोलिसांचे एक पथक हाँगकाँगच्या डचहुंड बँकेत जाऊन प्रक्रिया पूर्ण करून हे पैसे परत आणणणार, अशी माहिती आहे.
पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर असलेल्या कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्वीच (सर्व्हर) हॅक करून चोरट्यांनी बँकेच्या व्हिसा व रुपे डेबिट कार्ड धारकांची माहिती चोरून भारतासह २९ देशातील एटीएमच्या मदतीने ९४ कोटी ४२ लाख रुपये परस्पर काढले आहेत. ही रक्कम लंपास करण्यात महाराष्ट्रातील ४२८ एटीएम कार्ड्स तर केवळ पुण्यातील १७१ एवढे एटीएम कार्ड्स वापरण्यात आल्याचे समोर आले आहे.