पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या राहुल शेवाळे यांना धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. मात्र, त्याने पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर वर्तमानपत्रात त्याने दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात सुप्रिया सुळे त्याला जाब विचारत असल्याचे या फोन रेकॉर्डिंगमध्ये रेकॉर्ड झाले आहे. या फोन रेकॉर्डिंगमध्ये सुप्रिया सुळे राहुल शेवाळे नावाच्या या व्यक्तीला "तुम्ही आमची बदनामी का करत आहात, अशी विचारणा करतात. तसेच, मी एक प्रामाणिक स्त्री आहे, माझ्या नादाला लागू नका. जर लागलात तर काय करायचे ते तिथे येऊन करेल." अशा आशयाचे संभाषण त्यात रेकॉर्ड झाले आहे. या सगळ्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल झाली आहे.
याबाबत, बोलताना राहुल शेवाळे यांनी सांगितले की, मी पक्ष सोडल्यामुळे सुप्रिया सुळे या माझ्यावर नाराज असून त्यांनी मला धमकी दिल्याचे म्हटले आहे. तुला बघुन घेऊ, माझ्या नादाला लागू नको अशी धमकी दिल्याचेही राहुल शेवाळेंनी सांगितले. मात्र, मी पवार कुटुंबियांवर टीका केली नाही. माझ्या पक्षांतराची बातमी वर्तमानपत्रात आली आहे. त्याची सल त्यांना असावी. आता मला अज्ञात लोकांचे फोन येत आहेत. माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, पुढे काय करायचे ठरवले नाही असेही राहुल शेवाळींनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, "हे माझ्या विरोधात षडयंत्र असून मी राहुल शेवाळेच्या विरोधात डीफिमेशन केस दाखल करणार आहे. निवडणुक अवघ्या तीन दिवसांवर आली असतांना अशा पद्धतीने माझ्यावर आरोप केला जात आहे. आमच्या पक्षातून अनेक जण भाजपमध्ये गेले आहेत. ते काही एकटेच नाहीत.मी एक महिला आहे. म्हणून अशा पद्धतीचे घाण राजकारण केले जात आहे". असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी जर धमकी दिली असेल, तर त्यांनी माध्यमांकडे जाण्याची गरजच नव्हती. ते थेट पोलीस स्टेशनला का गेले नाहीत. असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.