पुणे - दुष्काळ तुमचा, निर्धार आमचा, अशी जाहिरात करणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे, हे दिसून येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावेळी बारामतीचे पाणी बंद करण्यावरून विचारलेल्या प्रश्नावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. सुळे यांनी बारामती मतदारसंघातील 9 तालुक्यात पाणी प्रश्नासंदर्भात सोमवारी पुण्यातल्या सिंचन भवन येथे जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या.
पाण्याच्या प्रश्नावरून राजकारण करू नये, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. आरएसएसपासून चिकाटी शिका, या शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांच्यापेक्षा पवार साहेबांमध्ये चिकाटी काही कमी आहे का? असे वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातून बारामती भागासाठी नीरा डावा कालवामधून सोडलेले पाणी हे अनधिकृत असल्याने ते बंद करावे, असे आदेश सिंचन मंत्र्यांनी दिलेले आहे. माढा मतदारसंघातील काही तालुक्यांच्या हक्काचे हे पाणी आहे, असे सांगत आता नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह निबाळकर या पाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सोमवारी ते पुण्यातील सिंचन भवनमध्ये दाखल झाले आणि बारामतीचे पाणी बंद करण्यासाठी आदेश काढावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सुप्रिया सुळे देखील सिंचन भवन येथे होत्या. मात्र, नीरा डावा कालव्याच्या प्रश्नाबाबत आपल्याला फारसे माहिती नाही असे त्यांनी सांगितले.