पुणे - मूल होत नसल्याने एका 21 वर्षांच्या विवाहितेकडून अघोरी पूजा करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती, सासू-सासरे, मांत्रिक महिलेसह एका सहकाऱ्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन दिलीप कदम, दिलीप तुकाराम कदम, सिमा दिलीप कदम, सोलनकर आणि स्वामी चिंचोली अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार महिला आरोपी नितीन कदम याची पत्नी आहे. मूल होत नसल्याने तो पत्नीला वारंवार मारहाण करत होता. तसेच शारीरिक छळ केल्याचे देखील तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपी मांत्रिक महिलेने आपल्यामध्ये अलौकिक शक्ती असून मी सांगितलेले न ऐकल्यास मूल होणार नाही, अशी भीती तक्रारदार दाखवली. तसेच पीडितेच्या केसांच्या दोन बटा या मांत्रिक महिलांनी पाडल्या होत्या. हा संपूर्ण प्रकार नोव्हेंबर 2016 ते जून 2020 या कालावधीत घडला. तक्रार महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास साहाय्यक फौजदार काळे करत आहेत.