पुणे Sunil Deodhar On Ram : माजी संघ प्रचारक सुनील देवधर आज (बुधवारी) पुण्यात म्हणाले की, यापूर्वी ज्यांनी ज्यांनी रामाशी पंगा घेतला त्यांना त्यांना रामानं धडा शिकवला आहे. त्यामुळं शंकराचार्यांनी काय विधान केलं, मला माहीत नाही. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. राम मंदिराला कोणी जावं, कुणी जाऊ नये हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. (Vishwa Hindu Parishad)
पुण्यात विशेष कार्यक्रम : पुण्यात 20 आणि 21 जानेवारी रोजी विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती कडून 'रंगीले राम' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये रामायणातील सात मुख्य प्रसंग मोठ्या चित्राकृतीतून दाखवण्यात येणार असून 300 किलोची रांगोळीसुद्धा साकारण्यात येणार आहे. यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुनील देवधर बोलत होते.
विविध कार्यक्रमांची रेलचेल : पुण्यातील कार्यक्रमात प्रभू श्रीरामाची १०० फूट भव्य रंगावली, रामचरित्रावर अखंड गायन-भजन-नृत्य सादरीकरण, श्री रामायणावरील १२५ चित्रांचे प्रदर्शन, श्रीराम खिचडी प्रसाद वाटप, प्राचीन शस्त्र आणि श्रीराम मंदिर प्रतिकृती-पुस्तके-गौ साहित्याचे प्रदर्शन अशा नानाविध कार्यक्रमांनी 'श्रीराम रंगी रंगले' उत्सवात स्वप्नपूर्तीचा जल्लोष होणार आहे.
रंगबेरंगी कार्यक्रमांची रेलचेल : 20 आणि 21 जानेवारी रोजी सकाळी 10 ते रात्री 10 यावेळेत नारायण पेठेतील रमणबाग प्रशालेत या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विश्व हिंदू परिषद आणि संस्कार भारती पुणे महानगर यांनी उत्सवाचं संयोजन केलं आहे. श्रीराम मंदिर, अयोध्या येथे होत असलेल्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव पुण्यात भव्य स्वरूपात होणार आहे. प्रभू श्रीरामाची 700 स्क्वेअर फूट आकारात भव्य रांगोळी संस्कार भारती आणि श्रीरंग कलादर्पणचे कलाकार साकारणार आहेत. यामध्ये रामायणातील 7 प्रसंग रेखाटण्यात येणार असून त्याकरिता 250 किलो रंग आणि रांगोळी लागणार आहे. ही भव्य रांगोळी साकारण्यासाठी 40 तासांचा कालावधी लागणार आहे.
भजन, नृत्यासोबत मर्दानी खेळ : आर्ट इंडिया फाऊंडेशनतर्फे श्री रामायणावर आधारित 125 चित्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. प्रदर्शनात जगभरातून काढलेल्या 2 हजार चित्रांमधील 1250 सर्वोकृष्ट चित्रे ठेवण्यात येणार आहेत. शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचातर्फे प्राचीन 700 शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. तसंच दिग्गज कलाकारांकडून रामचरित्रावर अखंड गायन-भजन-नृत्य सादरीकरण केलं जाणार आहेत. दोन दिवसीय उत्सवात येणाऱ्या प्रत्येक रामभक्ताला श्रीराम खिचडी प्रसादाचं वाटप केटरिंग असोसिएशनच्या वतीनं होणार आहे. उत्सवात प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा: