पुणे - देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असताना, हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत. त्यात विना मास्क फिरणाऱ्या शेकडो-हजारोंची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत. असे असताना वारकऱ्यांच्या उपासनेच्या या मूलभूत अधिकारावर गदा का आणण्यात येत आहे ? महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना वारीला विरोध का करण्यात येत आहे. कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने फक्त शिस्तप्रिय वारकऱ्यांवर का लादली जात आहेत ? असा सवाल करत विश्व हिंदू परिषदेच्यावतीने येत्या 17 तारखेला राज्यभर आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र गोव्याचे क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी दिली.
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने गुरूवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत मंत्री विजय देशपांडे, विभाग मंत्री तुषार कुलकर्णी आदी उपस्थित होते.
येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलन -
लवकरात लवकर सरकारने वारकऱ्यांच्या मागण्यांचा निश्चित निर्णय न घेतल्यास येत्या काळात महाराष्ट्रव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. तसेच या नंतरही साधू संतांची, वारकऱ्यांची होणारी अवहेलना न थांबल्यास संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी वारकरी - संत समाज येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरेल, अस इशाराही यावेळी विश्व हिंदू परिषदेने दिला आहे.
किमान ४० ते ५० वारकऱ्यांना वारी करण्याची परवानगी द्यावी -
प्रत्यक्षात वारीबाबत वारकऱ्यांच्या माफक मागण्या आहेत. सुमारे ७०० वर्षांची पायी वारीची परंपरा आहे. यावर्षी संत तुकाराम महाराजांचा ३६६ वा पालखी सोहळा आहे. संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज या प्रमुख संतांच्या पालख्यांसह इतर पूजनीय संतांच्या पालख्या ही पंढरपुरात दाखल होत असतात. या पालख्यांसोबत असंख्य दिंड्या असतात. या प्रत्येक दिंडीतील किमान २ वारकऱ्यांना (विणेकरी सह टाळकरी) यांना वारी करू द्यावी. मानाच्या प्रत्येक पालखी सोबत किमान ४० ते ५० वारकऱ्यांना वारी करण्याची परवानगी द्यावी. यात फक्त दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांनाच कोरोनाचे नियम पळून आरटीपीसीआर तपासणी करून प्रवेश द्यावा. अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
वारकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे -
सरकारचा वारी विरोध म्हणजे सरकारने आस्मानी संकटांचा फायदा घेत पोलीस प्रशासनाच्या बळाने वारकऱ्यांवर जाणीवपूर्वक केलेले सुलतानी अत्याचार आहेत. महाराष्ट्राचे जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना केलेली अटक त्यानंतर फसवून केलेली त्यांची नजर कैद हा त्याचाच एक प्रकार आहे. भर रस्त्यात वारकऱ्यांचे पारंपारिक गणवेश उतरवायला लावून, हिंदुत्वाचे व महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या भागवत धर्मीय पताकाची अवहेलना करणाऱ्या निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागितली पाहिजे. जागोजागी अडवणूक केलेल्या सर्व वारकऱ्यांना सन्मानपूर्वक तत्काळ मुक्त करावे व त्यांच्यावर लावलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे. अशी मागणी तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प शिवाजी मोरे यांनी केली आहे.
कीर्तने, प्रवचने, दर्शन यावरील प्रतिबंध दूर करावे -
आषाढी एकादशी पासून महाराष्ट्रात विविध भागात विविध मठांमध्ये चालणारे चातुर्मास सेवा व मंदिरातील पारंपारिक उत्सव, वारकरी सप्ताह, कीर्तने, प्रवचने, दर्शन या वरील प्रतिबंध दूर करावे. जसे कार्यालयात, बस प्रवासात, थिएटर किंवा हॉटेल मध्ये ५० % उपस्थितीला मान्यता दिली आहे तशी ह्या अनुष्ठानांना अनुमती द्यावी. असे ही यावेळी शंकर गायकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी सरकारी पूजेसाठी पंढरपुरात येवू नये -
मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारी पूजेसाठी पंढरपुरात येवू नये, असेही यावेळी सांगण्यात आले. महाराष्ट्राची भूमी ही साधू-संतांची महान परंपरा लाभलेली पुण्यभूमी आहे. याच परंपरेतील वारी हा वारकरी संप्रदाय व वारकऱ्यांच्या उपासनेचा व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शेकडो वर्षांची पायी वारीची ही परंपरा मुघलांच्या तसेच इंग्रजांच्या काळात ही अबाधित होती. परंतु गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे पायी वारीची परंपरा खंडित झाली. पारतंत्र्यात किंवा स्वतंत्र भारतात उपासने करीता कधी ही कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासली नाही. किंवा धर्मसत्तेने कधीही राज्यसत्येकडे तशी परवानगी ही मागितली नाही. परंतु आज वारकऱ्यांचा उपासनेचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. असे ही यावेळी गायकर यांनी यावेळी म्हटले आहे.