पुणे - मुंबईमध्ये जुन्या व धोकादायक इमारतीत अनेकजण जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या इमारती कधी बांधल्या आहेत? तिचे आयुष्य किती आहे? याची संपूर्ण माहिती घेणे सरकार व महानगरपालिकेचे काम आहे. शेवटी प्रत्येक गोष्टीला या जगात आयुष्य व मर्यादा असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ही दुर्घटना सरकार व महापालिकेच्या दुर्लक्षामुळे घडली असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली. मंगळवारी घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांना जीव गमवावा लागला आहे.
त्यामुळे वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. पण ती कारवाई होत नाही आणि अशा मुंबईत झालेल्या दुर्दैवी घटना पहाण्याची वेळ येत असल्याचे मतही अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.
शहरीकरण वाढत असताना नव्याने उभ्या राहणाऱ्या इमारती व जुन्या इमारती यांच्या रेकॉर्डची तपासणी करण्याची गरज आहे. मात्र, शासकीय कर्मचारी ही जबाबदारीची कामे करत नाहीत. त्यामुळे अशा दुर्दैवी घटनांचा सामना करावा लागत असल्याचे मत अण्णा हजारेंनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले. ते शिरुर तालुक्यातील कोंढापुरी येथे वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आले होते. शासकीय आधिकाऱ्यांना गडगंज्य पगार दिला जातो. त्यातून जनतेचे संरक्षण केले पाहिजे. मात्र, जनतेच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते असल्याचे अण्णा म्हणाले.