बारामती - सकाळी लवकर कामाला सुरूवात केली, तर कामे लवकर होतात. गर्दी होत नाही. मात्र आम्ही दहा वाजता गेलो तर माणसं बाजूला करायला वेळ लागतो. मात्र काहीजण दादा सेल्फी, दादा फोटो त्यांना नाही म्हणावं तर काय ताठलाय आता. उपमुख्यमंत्री झाला साधा सेल्फी काढू देईना. ह्याची बटनं दाबून दाबून आम्ही मेलो इतके दिवस. असं म्हटलं जातं. त्यामुळे कुठं काय करता म्हणून आपलं गप्प बसायचं. अन् पहाटे जेवढं काही उरकता येईल तेवढं उरकून घ्यायचा प्रयत्न करायचा, अशा मिष्किल शैलीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना चिमटा काढला.
बारामती तालुक्यातील घाडगेवाडी येथील एका कार्यक्रमामध्ये रविवारी (दि. १४ ) उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांच्याकडे निर्देश करत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, हा सदगृहस्थ मला पहाटे ५ वाजून ४० मिनिटांनी भेटायला आला. म्हणजे तो एक-दोन तास आधी उठला असेल. सकाळी लवकर कामाला सुरूवात करणे चांगले असते.आता आमचे बाळासाहेब किती वाजता उठतात ते सुद्धा मी पाहणार आहे. अशी टिप्पणी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्यावर करताना कार्यक्रमस्थळी खसखस पिकली..
तुटेपर्यंत ताणायचे नसते -
कुठेही तुटेपर्यंत ताणायचे नसते. ते सुद्धा समाधानी झाले पाहिजेत. प्रवाशी सुद्धा समाधानी झाले पाहिजेत. तसेच सरकार म्हणून आम्हाला देखील निर्णय घेता आला पाहिजे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आपली प्रतिक्रया व्यक्त केली. तर त्रिपुरा येथे झालेल्या जातीय दंगलीचे पडसाद राज्यातील काही शहरांमध्ये उमटले. मात्र अशा वेळी संयम ठेवून जातीय सलोखा वाढवला पाहिजे. दंगलीमुळे सर्वसामान्य गरीब लोकांना फटका बसतो. काही लोक भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असतील. तर पोलीस दलाला मदत करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.