बारामती - सभेच्या वेळी पावसात आपण भिजलो. तर काय घडतं हे मागील विधानसभेच्या निवडणुकीवेळी सातारच्या सभेने दाखवून दिले आहे. त्यामुळे आपण हा शुभशकुन मानूयात, असा दाखला देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सांगता सभेत उपस्थितांची मने जिंकली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे 12 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर सांगता सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
हे ही वाचा - Lakhimpur Case : केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घ्या - नवाब मलिक
पुढे बोलताना पवार म्हणाले की, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी आणि घटक पक्षांनी बंदचा नारा दिला आहे. उद्याचा महाराष्ट्र कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. राज्यकर्त्यांची मजल आज शेतकऱ्यांना चिरडण्यापर्यंत गेली आहे. शेतकऱ्यांना चिडणारे आरोपी मंत्र्यांची मुले आहेत. ती सापडत नाहीत. कोणी म्हणते ती नेपाळला पळून गेली आहेत. असे सांगत एखाद्या भागातील शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल आणि देशभरातील शेतकरी त्या अन्यायाच्या विरोधात उठला तरच अशा गोष्टींना आळा बसेल व अशाप्रकारे शेतकऱ्यांना चिरडण्याचे धाडस कोणाचे होणार नाही. असे म्हणत पवारांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.