पुणे- मुसळधार पाऊस झाल्यानंतर शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी शिरले होते. यामुळे हजारो कुटुंब स्थलांतरित झाली. मात्र, नद्यांच्या पाण्याबरोबर साप घरात आले आहेत. शहरातील काही भागातून सर्प मित्रांनी १२ सापांना जंगलात नैसर्गिक ठिकाणी मुक्त केले आहे.
पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यासोबत अनेक साप घरामध्ये घुसत असल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ होत आहे. मात्र, पिंपरीतील काही सर्प मित्र तरुण खास 'सापांसाठीचे रेस्क्यू ऑपरेशन' राबवत असल्याच बघायला मिळाले.
पिंपरीतील WWA या संस्थेतील सर्पमित्रांनी आत्तापर्यंत असे अनेक साप पकडून त्यांना जंगलामध्ये सोडले आहे. ज्यामुळे या सापांना जीवदान मिळाले असून जंगलामध्ये सोडले गेल्याने या सापांकडून मानवांनाही त्रास होणार नाही. आपल्या कामचे सर्व स्तरातून कौतुक होत असल्याने यापुढेही हे ऑपरेशन सुरू ठेवणार असल्याची माहिती या तरुणांनी दिली आहे. जुनी सांगवीमधील शितोळे नगर, मुळा नगर, मधूबन नगर, पिंपरी, बोपखेलसह कासारवाडी येथील काही घरांमध्ये साप आढळले आहेत.