पुणे - पिंपरी चिंचवड शहरात एटीएम लुटणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. शहर पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केली असून 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संबंधित आरोपी हरियाणातून पुण्याला विमानाने प्रवास करायचे. यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात रेकी करून एटीएमला लक्ष्य करत होते. अझरुद्दीन ताहीर हुसेन (वय-२९), सुर्रफुद्दीन हसिम (वय-२२), संदीप माणिक साळवे (वय-४३), दत्तात्रय रघुनाथ कोकाटे (वय-४२), मोहम्मद शाकिर हसन (वय-३५), गौतम किसन जाधव (वय-३८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मागील काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एटीएम फोडीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या १५ दिवसात दोन एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने फोडण्यात आल्या होत्या. यानंतर वाकड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांना आरोपी पिंपरी-चिंचवडमध्ये आल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.अधिक चौकशी केल्यानंतर कोठडीतील आरोपीने कबूली दिली. तसेच अन्य आरोपी हरियाणात असल्याचे सांगितले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरीश माने यांच्या पथकाने हरियाणात गेले.
दहा दिवस आरोपी असलेल्या ठिकाणी पोलीस अधिकारी वेषांतर करून राहिले. मुख्य आरोपीचा शोध लावला; आणि यानंतर इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले. संबंधित कारवाईत हरियाणातून मुख्य आरोपीसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.