पुणे(आंबेगाव) - कोरोनाची दुसरी लाट येत असताना राज्यातील रक्तपेढीमध्ये वेगवेगळ्या रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. ज्या व्यक्तीला रक्तदान करणे शक्य आहे अशा प्रत्येक व्यक्तीने आपलं कर्तव्य म्हणून रक्तदान करण्याचे आवाहन कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे.
कोरोनानंतरही धोका कायम
मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यादरम्यान त्यांनी कोरोनावर मात करून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनानंतरही धोका कायम असतो, त्यामुळे मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा कोरोनाकाळात घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मंत्री वळसे-पाटील यांनी केले आहे.
कोरोनानंतर नवीन आजारांचा धोका
कोरोनानंतर योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर त्या व्यक्तीला विविध आजार होण्याचा धोका असतो किंवा नव्याने एखादा आजार उद्भवण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोनाच्या आधी व नंतरही शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीने काटेकोरपणे पालन करावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम, जेवण व आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वळसे-पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा - दोन्ही 'राजे' भाजपाच्या प्रभावाखाली... मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यास संभाजी ब्रिगेड आग्रही
हेही वाचा - बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग 1 मे 2021 मध्ये वाहतूकीसाठी खुला होणार, मुख्यमंत्री ठाकरेंची माहिती