पुणे - जिल्ह्यातील बारामती येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग रोखण्यास बारामती प्रशासनाला यश आल्यानंतर व्यापारी महासंघाने दुकाने सुरू करण्याबाबत विनंती केली होती. त्यानंतर प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सर्व दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले असून आजपासून सर्व व्यवहार सुरू होत आहेत. त्यामुळे बारामतीकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
बारामतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याने काल उशिरा पार पडलेल्या बैठकीत रोटेशन पद्धतीने दुकाने सुरू करण्यात आली आहेत. मात्र, दुकाने सुरू करताना काही नियम व अटी बंधनकारक असणार आहेत. यामध्ये दुकानात प्रवेश करणाऱ्या ग्राहकांची थर्मल चाचणी, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासह एकावेळी पाच ते दहाच ग्राहकांना दुकानात प्रवेश मिळणार असून त्या ग्राहकांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, वेळ याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत दुकाने खुली असणार आहेत.
या दिवशी 'ही' दुकाने असणार सुरू -
सोमवार व गुरुवार - अॅटोमोबाईल्स (फक्त सर्विसिंग, कॉम्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी), रेडिमेड फर्निचर दुकाने, मोबाईल शॉप, फोटो स्टुडिओ, स्वीट होम्स, खेळणी, फुले व पुष्पहार दुकाने सुरू राहतील.
मगंळवार व शुक्रवार - कापड, भांडी, टेलरिंग, फुटवेअर दुकाने, रस्सी, पञावळी, ज्वलेरी, सोने दुकाने, वॉच स्टोअर्स, सुटकेस बॅग आदी दुकाने सुरू राहणार आहेत.
बुधवार व शनिवार - जनरल स्टोअर्स, कटलरी, सायकल स्टोअर्स, टायर्स व पंक्चरची दुकाने, स्टील, ट्रेडर्स, स्क्रॅप मर्चंड, हाँर्डवेअर, बिल्डिंग मटेरिअल, पेंट, कार वाशिंगल सेंटर, झेराँक्स, डिजीटल फ्लेक्स, प्रिंटीग, मातीची भांडी, टोपल्या, बांबू दुकाने सुरू राहतील.
दररोज - जीवनाश्यक सेवा अंतर्गत किराणामाल दुकाने, भाजीपाला, फळे, दूध, शेतीविषयक बी-बियाणे, औषधे आदी दुकाने दररोज सुरू राहतील
नागरिकांच्या सोईसाठी टाळेबंदीच्या नियम व अटी वर दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित असून दुकानदारांनी सॅनीटायझरचा वापर करावा, सामाजिक आंतर राहील याची दक्षता घ्यावी.