पुणे - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे आज (२० जुलै) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या ८६ वर्षाच्या होत्या. तर शनिवारी रात्री वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निर्मला पुरंदरे यांनी १९८१ ला 'वनस्थळी' या संस्थेची स्थापना करुन ग्रामीण भागातील महिलांचे सबलीकरण, त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि रोजगारासाठीचे प्रशिक्षण यासाठी काम सुरू केले. सामाजिक काम करताना त्यांनी विविध विषयांवर लेखन देखील केले. स्नेहयात्रा हे त्यांचे प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी असूनही त्यांनी आयुष्यभर स्वतःचे वेगळे व्यक्तिमत्व आणि लेखन शैली जोपासली.
त्यांच्या पश्चात पती बाबासाहेब पुरंदरे, २ मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान, त्यांच्यावर शनिवारी रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.