पुणे - शरद पवारांच्या आर्शिवादानेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी काल खेड तालुक्यातील बायपासच्या उद्घाटन कार्यक्रमात केले होते. अमोल कोल्हेंच्या या वक्तव्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी समाचार घेतला आहे. 'कोल्हेंनी स्वतःची लायकी पाहून बोलावे', असे खडे बोल त्यांनी अमोल कोल्हेंना सुनावले आहे.
'...एवढी माझी माफक अपेक्षा होती' -
स्थानिक विषयांत पवार आणि ठाकरेंचा प्रश्न येत नाही. त्यामुळे कोल्हेंनी स्वतःची लायकी पाहून बोलावे, त्यांनी उगाच उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घ्यायला जाऊ नये, अशी प्रतिक्रिया शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. तसेच खेड बायपासचे काम मी खासदार असताना सुरु केले होते, तरीही या कार्यक्रमाला मला डावलण्यात आले. माझ्या मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो तिकडे नव्हता. मला या कार्यक्रमात बोलवावे, एवढी माझी माफक अपेक्षा होती, असेही ते म्हणाले.
'उद्या तुम्ही पवारांना पण म्हातारा म्हणणार का?' -
मी म्हातारा असलो तरी माझ्याकडे बुद्धीमत्ता आहे, समज आहे. खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असे काहीतरी समीकरण जोडून लोकांची दिशाभूल करणे त्यांनी थांबवावे. माझे काम नटसम्राटासारखे नसल्याचेही पाटील म्हणाले. उद्या तुम्ही पवारांना पण म्हातारा म्हणणार का?, असा प्रश्नही त्यांनी अमोल कोल्हेंना विचारला.
'जेवढी स्क्रिप्ट दिली तेवढंच बोला' -
जेवढी स्क्रिप्ट दिली तेवढंच बोलावे उगाच आगाऊपणा करू नका. कोरोना महामारीच्या काळात दीड वर्ष हे खासदार घरात लपून बसले होते. मी मतदार संघात जाऊन गावागावांत फिरत होतो. शुटींग केल्याशिवाय माझ्या घरातली चूल पेटत नाही, असे कोल्हे म्हणतात, मात्र, त्यांनी अडीच लाख रुपये पगार आहे, तरी चूल पेटत नाही का? तसेच लोकांनी तुम्हाला सकाळी सात ते संध्याकाळी सात शुटींग करण्यासाठी निवडून दिले, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
हेही वाचा - मुंबईत मुसळधार पावसादरम्यान 11 ठिकाणी दुर्घटना, 21 जणांचा मृत्यू