खेड (पुणे) - पुणे-नाशिक महामार्ग बाह्यवळणावरील खेड घाटाचा उद्घाटन समारंभ शनिवारी (दि. १७) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आयोजित केला आहे. मात्र, त्या अगोदरच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळी या घाटात वाहनांना भगवा झेंडा दाखवून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. यावरून खेड घाट बाह्यवळणाच्या उद्घाटनावरून खेडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे, असे दिसत आहे.
शिवसेनेचा आरोप -
पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट बायपासच्या कामाच्या श्रेयाची चोरी करुन वचनपूर्ती करण्याचे थोतांड केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी केला आहे. त्यांनी मार्गाचे शिवसैनिकांसमवेत उद्घाटन करत बाह्यवळण मार्ग प्रवाशांसाठी खुला केला.
मार्ग खुला करत प्रवाशांना शिवसैनिकांनी दिल्या शुभेच्छा -
खेड घाटातील बायपासचे काम बंद पडले असताना केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करुन आज अखेर बाह्यवळणाचे काम पुर्ण केले. मात्र अचानक या मार्गाचे उद्घाटन करण्याचा घाट खासदार कोल्हे यांनी घातला. या कामासाठी कुठलेच योगदान नसताना त्या कामाचे श्रेय घेण्याचे काम कोल्हे करत आहेत. त्यामुळे येथील शिवसैनिकांनी आक्रमक होत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत उद्घाटन करून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला केला आहे. यावेळी प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन पुढील प्रवासासाठी शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या.
यांची होती उपस्थिती -
याप्रसंगी जिल्हाप्रमुख शरद सोनवणे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे व रुपाली कड, प्रकाश वाडेकर, नितीन गोरे, विजया शिंदे, मारुती सातकर, विजयसिंह शिंदे, अशोक खांडेभराड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.