पुणे - लाखो रुपयांचे भांडवल गुंतवून पिकवलेले पीक पाण्याखाली गेल्याने शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. साबळेवाडी टाकळीहाजी येथील बाळू साठे, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - धक्कादायक.. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात दहा महिन्यात १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
राज्यभर पावसाने थैमान घातले आहे. यात शेतकऱ्याला मोठा फटका बसला आहे. खरीप पिकाचे नुकसान झाले असल्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात आणि आता पश्चिम महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्या सत्र सुरू झाले आहे.
कष्टकरी बळीराजा हवालदिल झाला असताना रविवारी सकाळच्या सुमारास शिरूर तालुक्यातील शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावसाने दांडी मारली आणि पिकाच्या काढणीवेळी व रब्बी हंगामाच्या लागवडीच्यावेळी परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. मोठ्या कष्टाने उभारलेले पीक व शेती पाण्याखाली गेली. मोठ्या भांडवली खर्चातून पिकवलेले पीक वाया गेल्याने साठे यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यानुसार महसूल विभागाने रविवारी घटनास्थळी पंचनामा केला आहे.
दरम्यान खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात खरीप व रब्बी हंगाम अशा दोन्ही हंगामातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच बळीराजा मदतीची हाक मागत मायबाप सरकारकडे हात जोडत असताना मायबाप सरकार पुढील काळात काय मदत करणार याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - निफाडमध्ये गिरीश महाजनांच्या बैठकीत शेतकरी आक्रमक; द्राक्ष बागायतदारांना भरपाई देण्याची मागणी