पुणे - पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने १२ दिवसात पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, हा फक्त चटका होता. जर भारताने बदला घ्यायचे ठरवले, तर राजकीय नकाशावरून पाकिस्तान गायब होईल, अशी खरमरीत प्रतिक्रिया लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केली आहे.
शेकटकर म्हणाले, की भारताने काही दिवसांमध्ये पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या वेळी पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय सैन्यांकडून सर्जिकल स्ट्राइक करून उत्तर दिले होते. मात्र, यावेळी सर्जिकल स्ट्राइक करून आपली क्षमता भारताने दाखवून दिली आहे. दरम्यान, पाकिस्तान यातून धडा शिकेल की नाही, हे माहीत नाही. त्यामुळे भारताला अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. कदाचित पाकिस्तान समुद्रामार्गे भारतावर हल्ला करण्याची शक्यता आहे. यावर जास्त बोलणे योग्य होणार नाही. मात्र, हे निश्चित आहे की जर पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन देणे बंद केले नाही, तर पाकव्याप्त काश्मीर आणि मुजफ्फराबाद नंतर इस्लामाबाद भारताचे लक्ष असू शकते.