पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातुन शरद पवार निवडणुक लढवणार नाहीत. असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यामध्ये दिले आहे. त्यामुळे 'त्या' चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, माढा मतदारसंघातून कोण उमेदवार असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असलेल्या लोकसभा मतदार संघाच्या इच्छुकांची आज पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला खुद्द शरद पवार ही हजर आहेत. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी. असा आग्रह काही कार्यकर्त्यांनी केला. मात्र, शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे.
या बैठकीला उपस्थित असलेले पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर आपली प्रतिक्रिया मांडली. त्यात ते म्हणतात, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मात्र, शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढवतील असे वाटत नाही, त्यांनी तेथून लढवूही नये असे मला वाटते. असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.