पुणे - मालमत्तेचा न्यायनिवडा जातपंचायतीसमोर करण्यास विरोध केल्यामुळे जातपंचायतीने एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना समाजातून एक वर्षासाठी बहिष्कृत केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्याशिवाय समाजात परत यायचे असल्यास ५ दारूच्या बाटल्या, ५ बोकड आणि १ लाख रूपये दंड रोख देण्याची मागणी जातपंचायतीने केली होती. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी आता जातपंचायत भरविणाऱ्या सात पंचांना अटक केली आहे.
सासवड पोलिसांची कारवाई
या गुन्ह्याचे गांभीर्य पाहता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांची भेट घेऊन आरोपीला ताबडतोब अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सासवड पोलिसांनी शनिवारी रात्री आरोपींना अटक केली आहे. सुरेश रतन बिनावत (वय ६५), नंदू अत्राम रजपतू (वय ५५), संपत पन्नालाल बिनावत (वय ५६), मुन्ना रमेश कचरवत (वय ५७), आनंद रामचंद्र बिनावत (वय ५०), देवीदास राजू चव्हाण (वय ५२), देवानंद राजू कुंभार (वय ५१) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
समाजाच्या ग्रुपवर मेसेज केला व्हायरल
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी सीमा (नाव बदलले आहे) गृहिणी असून कुटुंबीयांसह धनकवडी परिसरात राहायला आहेत. त्यांची आईही धनकवडीत राहायला आहे. सीमाच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यांपासून आरोपी सुरेश बिनावत त्यांच्या आईला फोन करून जातपंचायतीमध्ये मालमत्तेचा निवाडा करण्याचे सांगत होता. मात्र, त्यांनी मालमत्तेच्या निवाड्याला विरोध केल्यामुळे सुरेशाला राग आल्यामुळे त्याने सीमा यांच्या आईला फोनवर शिवीगाळ केली. त्यामुळे त्या चक्कर येउन पडल्या. त्यानंतर सीमा यांनी स्वतःचा व्हाईस रेकॉर्ड करून जागेसंदर्भात आईला कोणीही त्रास न देण्याच्या मेसेज त्यांच्या समाजाच्या ग्रुपवर व्हायरल केला. त्यामुळे सुरेशला राग आल्यामुळे त्याने जातपंचायतीचे मिटींग बोलावून सीमासह तिच्या बहिणींनी माफी मागण्यास सांगितले.
मदत करणाऱ्यांनाही धमकी
जातपंचायतीच्या मिटींगमध्ये सीमा आणि तिच्या कुटुंबीयांसह बहिणीला समाजातून एक वर्ष बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. जर एक वर्षांच्या आतमध्ये जाती-समाजामध्ये परत यायचे असल्यास संबंधितानी पंचकमिटीली ५ दारूच्या बाटल्या, ५ बोकडे आणि १ लाख रूपये दंड म्हणून दयावा लागेल असे सांगितले. वर्षाच्या आतमध्ये ते जातीमध्ये न आल्यास कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याचा इशारा दिला. जो कोणी संबंधितांना मदत करेल, त्यांना जातीतून बहिष्कृत केले जाईल. त्यांना कोणीही कार्यक्रमाला बोलावू नका, असा व्हिडिओ काढून सीमा यांच्या कुटुंबीयांना पाठवित समाजातून बहिष्कृत केले आहे. याप्रकरणी सासवड पोलीस तपास करीत आहेत.