दौंड (पुणे) - कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या दौंड शहरातील चार दुकाने सील करण्यात आली आहेत. दौंड पोलिसांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर वचक बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दुकानदारांकडून नियमांचे उल्लंघन -
दौंड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना वारंवार पोलीस प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या. तरीदेखील काही दुकानदार या सूचनांचे पालन करताना दिसत नाही. दौंडचे पोलिसांनी याची दखल गांभीर्याने घेऊन जे दुकानदार नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे दुकान लॉकडाऊन संपेपर्यंत सील करण्याचे प्रस्ताव त्यांनी तहसीलदारांना पाठवला होता.
४ दुकानांवर कारवाई -
दौंड शहरातील मकसाने सुपर मार्केट, सपना ड्रेसेस, आहूजा मोबाईल शॉप तसेच ओम बँगल्स अँड गिफ्ट या चार दुकानदारांवर नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. तसेच लॉकडाऊन काळात अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर यापुढील काळातही अशीच कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारारी प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.