पिंपरी-चिंचवड - जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 336वा पालखी सोहळा 1जुलैला पार पडला. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे सावट असल्याने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. टाळ मृदंगाच्या गजरात शासकीय बसने तुकोबांच्या पादुका पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत.
ग्यानबा तुकारामाच्या गजरात आज पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी मुख्य मंदिरातून हरिनामाच्या गजरात पालखीने मंदिराला प्रदक्षिणा घालत प्रस्थान ठेवले. त्यानंतर, पालखी मुख्य मंदिरातून इनामदार वाड्यात पोहोचली. तिथे, आरती झाल्यानंतर एसटीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. एसटी देहूच्या बाहेर पडताच अनगडशहा बाबा दर्ग्याच्या इथे पादुकांची आरती करण्यात आली.
देहू नगरी ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमून गेली. मात्र, जमावबंदी असल्याने राज्यातील इतर भाविक आणि शेजारील गावकऱ्यांना हा सोहळा डोळ्यात साठवता आला नाही. टाळ, मृदंगाच्या गजरात अवघे मंदिर भक्तिमय झाले होते. हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.
हेही वाचा - आषाढी वारी : कोरोनामुळे पंढरपुरात गर्दी नकोच, सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारचा निर्णय कायम