पुणे- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सार्वजनिकरित्या साजरे करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांतील सण अतिशय साधेपणाने साजरे झाले. भाविकांना आता वेध लागले आहे ते आषाढी वारीचे. मात्र, यावेळची आषाढी वारी मोजक्याच लोकांचा उपस्थितीमध्ये पार पडणार आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शनिवारी आळंदीत प्रस्थान होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आळंदीत 144 कलम लागू केले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन व आळंदी देवस्थानने आषाढी वारी सोहळा कमीत-कमी लोकांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 50 लोकांनाच पास देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अन्य लोकांना प्रवेश नसणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदीत येऊन गर्दी करू नये, असे आवाहन देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास ढगेपाटील यांनी केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आळंदीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे.
आषाढीवारी सोहळा हा प्रत्येकासाठी स्मरणात राहणारा सोहळा असतो. मात्र, या सोहळा काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे फक्त 50 पासधारक वारकऱ्यांच्या उपस्थितीतच सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे वारकरी व भाविकांनी आळंदीत गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी केले आहे.