पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील सलून, ब्युटी पार्लर बंद आहेत. आता शहर रेड झोनमधून वगळण्यात आले असून हळू-हळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. सम विषम तारखेनुसार शहरातील दुकाने खुली करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर, उद्यापासून अटी आणि नियमांसह सलून आणि ब्युटी पार्लर सुरू करता येतील, असे आदेश महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून परवानगी घेतलेल्या व त्याचे नियमानुसार दरवर्षी नुतनीकरण केलेल्यांना शहरामध्ये ब्यूटी पार्लर, सलून व्यवसाय सुरू करता येणार आहे. सदर परवाना वितरित करण्याचे व नुतनीकरणाचे कामकाज हे क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर सहा आरोग्याधिकारी करतात. महानगरपालिकेचा परवाना नसलेल्या किंवा परवाना नुतनीकरण न केलेल्या व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करता येणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.
व्यावसाय सुरू करण्यासाठीच्या अटी व नियम -
1) सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये पुरेसा सुर्यप्रकाश आणि मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था उपलब्ध असावी.
2) दुकानामध्ये असलेल्या दोन खुर्च्यांमध्ये किमान १ मिटरचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. ज्या ठिकाणी ३ खुर्च्या आहेत त्याठिकाणी एकावेळी १ ग्राहक, ज्या ठिकाणी ५ खुर्च्या आहेत, त्याठिकाणी २ ग्राहकांना बसता येणार आहे.
3) ब्युटी पार्लर, सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी दुकानाबाहेर सॅनिटायझर डिस्पेन्सर बसवावे लागेल.
4) प्रत्येक कामगाराने केशकर्तनापूर्वी व नंतर हात धुणे व निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील.
5) केशकर्तनालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने व तिथे काम करणाऱ्या व्यक्तींनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. ग्राहकांना केवळ केशकर्तनावेळी अथवा शेव्हींग करताना मास्क काढता येईल.
6) ग्राहकाकरिता प्रत्येकवेळी तोंड पुसण्याकरता नवीन नॅपकीन वापरण्यात यावे, अथवा वापरण्यात आलेला नॅपकिन प्रत्येक वापरानंतर सोडिअम हायपोक्लोराईटमध्ये किमान ३० मिनिटे भिजवून त्यानंतर धुतलेला व पूर्णतः वाळलेला असणे आवश्यक आहे. ग्राहकांना स्वत:चे नॅपकिन आणण्यास सांगितले तर उत्तम.
7) केशकर्तनाकरता अथवा शेव्हींगकरता वापरण्यात येणारे सर्व साहित्य प्रत्येक वापरापूर्वी सोडिअम हायपोक्लोराईट (०.१%) द्रावणामध्ये ब्लिचिंग, डेटॉल किंवा तत्सम द्रावणामध्ये निर्जंतूक करुन वापरावे.
8) प्रत्येक ग्राहक खुर्चीवर बसण्यापूर्वी त्या खुर्चीचे सोडिअम हायपोक्लोराईट अथवा सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. ग्राहकांना केशकर्तनालयासाठी अथवा शेव्हींसाठी वेळ निश्चित करुन ठराविक वेळेमध्येच बोलवण्यात यावे. दुकानामध्ये अथवा दुकानाबाहेर गर्दी करू नये.
9) चेहरा अथवा डोक्याची मसाज करण्याकरता येणाऱ्या ग्राहकांना मसाज करताना डिस्पोजेबल ग्लोव्हज वापरणे बंधनकारक राहील. ग्लोव्हज न वापरता मसाज करण्यात येऊ नये.
10) संपूर्ण केशकर्तनालयाचे दर ४ तासांनी सोडिअम हायपोक्लोराईट (१%) द्वारे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसेच दर ४ तासांनी जमीन / फरशी पुसणे आवश्यक राहील. केशकर्तनालयाच्या आत तसेच बाहेर सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक राहील.