पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा असलेल्या आषाढी वारीचा सोहळा साजरा होत आहे. माऊलींच्या पालखीचे मुख्य दिंडी मालक, देवस्थान विश्वस्त व शितोळे सरकार, शिंदे सरकार यांच्यासह 50 जणांच्या उपस्थितीत शासकीय नियमांचे पालन करत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान करण्यात आले. हरिनामाचा जयघोष करत विना-टाळ-मृदुंगाच्या गजरात आज पाच वाजता माउलींच्या पालखीचे प्रस्थान करण्यात आले. प्रस्थानानंतर मंदिराच्या बाजुला असणाऱ्या देऊळवाड्यात 14 दिवस पालखीचे वास्तव्य राहणार आहे. त्यानंतर हेलिकॉप्टर किंवा बसने माऊलींच्या पादुका पंढरीला नेण्यात येणार आहेत.
कोरोना महामारीच्या संकटामुळे यंदा पायीवारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. मात्र, सर्व प्रथा परंपरांचे पालन करून सोशल डिस्टंन्सच्या नियमांचे पालन करत वारकर्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सोहळ्याच्या पालखीचे प्रस्थान करण्यात आले आहे.
मोजक्याच वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात अलंकापुरी दुमदुमून गेली आहे. या सोहळ्याला वारकरी वारीची परंपरा जपताना दिसत होते. दरवर्षी इंद्रायणीचा घाट लाखो वारकऱ्यांनी गजबजलेला असतो. इंद्रायणीत स्नान करत विठू नामाच्या जयघोषात वारकरी तल्लीन होतात. मात्र या वर्षी वारकऱ्यांना इंद्रायणीचा घाट शांत पहायला मिळाला.
माऊलींच्या पालखीचा 14 दिवस मुक्काम आळंदीत
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका पालखीचे प्रस्थान झाले असून मंदिराच्या बाजुलाच असणाऱ्या देऊळवाड्यात 14 दिवस मुक्काम असणार आहे. याठिकाणी चौदा दिवस परंपरेप्रमाणे भजन-कीर्तनाचे सर्व सोहळे पार पाडले जाणार आहेत. मानाच्या दिंड्या प्रमुखांचे मार्गदर्शन घेऊन ऑनलाईन पद्धतीने कीर्तन-प्रवचन केले जाणार आहे. त्यामुळे हा पालखी सोहळा मर्यादित लोकांमध्ये होत असला तरी सर्व परंपरा यातून जपल्या जाणार असल्याचे आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त विकास पाटील यांनी सांगितले.