पुणे (भिमाशंकर) - पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र भिमाशंकरजवळील भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिर परिसरातील संरक्षण भिंत कोसळण्याच्या मार्गावर आहे. मंदिराच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले असून हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येते. मंदिराच्या बाजूने असणारी संरक्षण भिंत कोसळण्याच्या मार्गावर असून त्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे.
भोरगिरी कोटेश्वर मंदिराला "क वर्ग तिर्थक्षेत्र " दर्जा मिळाल्यानंतर मंदीर व परिसर विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. यातुन मंदिर व परिसरातील संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले. जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी या कामाची पाहणी केली असता हे संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे झालेले दिसुून आले. मंदिराच्या बाजूने असणारी संरक्षण भिंत कोसळण्याच्या मार्गावर असून आहे त्यामुळे मोठी हानी होण्याची परिस्थीती निर्माण झाली असल्याने संपूर्ण कामाची चौकशी करून कारवाई करण्याचे व पुन्हा चांगल्या बांधकामाची मागणी करणारे पत्र पुणे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी पंचायत समिती उपअभियंत्यांना दिले आहे.
भिमाशंकर जवळील 'भोरगिरी' येथील 'श्री कोटेश्वर' हे शिवशंभू महादेवाचे प्राचीन मंदिर असून या मंदिराला मोठा इतिहास लाभलेला आहे. शासनाने या देवस्थानाचा 'क' दर्जा तिर्थक्षेत्रात समावेश केल्यानंतर मंदिर व परिसर सुसज्ज करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. खेड पंचायत समितीच्या बांधकाम विभागा मार्फत या देवस्थानचे काम सुरू होते, मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष यामुळे ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे आढळून आले.