पुणे : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे पगार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वेळेवर होत नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिन्यात देखील 15 तारीख आली तरी कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. न्यायालयाने कर्मचाऱ्यांचे पगार 10 तारखेच्या आत करण्याचे आदेश दिले आहेत. तरी देखील त्यांचे पालन होत नाही. यामुळे राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी बैठक लावली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांची घेतली भेट: राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत पुण्यातील सर्किट हाऊस येथे आले होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील नागपूर येथील अधिवेशनात बैठक झाली. त्यानंतर मुंबईत देखील बैठक झाली आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मी आणि गोपीचंद पडळकरांनी भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबद्दल माहिती दिली.
तीव्र आंदोलनाचा इशारा: सदाभाऊ खोत म्हणाले की, सरकारला आव्हान आहे की, एसटी हे राज्याचे वैभव आहे. खेड्यापड्यातील जनतेचे साधन हे एस टी आहे म्हणून याकडे गांभीर्याने बघणे महत्त्वाचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरात लवकर बैठक लावण्यात यावी. जर येत्या दिवसात बैठक लावली नाही तर आमच्या समोर आंदोलन शिवाय पर्याय राहणार नाही. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा देखील यावेळी खोत यांनी दिला.
शरद पवारांनी डाव रचला: पहाटेचा शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधनावर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा शपथ विधी होऊ शकत नाही. कारण अजित पवार निर्णयच घेऊ शकत नाहीत. पवार साहेबांना माहीत नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. शेतामध्ये जेव्हा पीक येते तेव्हा पीक आल्यानंतर तिथे राखण्या बसवल्या जातो. तो बसवला की तो पाखरांना येऊ देत नाही. मग पाखरांना प्रश्न पडतो की दाणे कसे खायचे. पाखरे हुशार असताता ते १,२ दिवस शेतात येत नाही आणि राखण्याला वाटते आता पाखरे येणे बंद झाली आणि तो पण झोपून जातो. पण अचानक ही पाखरे येतात हल्ला करतात आणि दाने खाऊन जातात. राष्ट्रपती राजवट राज्यावर लागली की पाखरू रूपी पवार साहेबांना कळले की आता आपल्याला थोडे शांत राहावे लागेल. यामुळे राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी शरद पवारांनी हा डाव रचला होता, असा आरोप त्यांनी केला आहे.
कोश्यारींना छत्रपतींविषयी आदर: राज्यपालांच्या राजीनाम्यावर ते म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आदर होता. म्हणून ते सिंहगड, रायगडवर चालत गेले. काही गोष्ठी अवधानाने बोलले गेले की लगेच त्याचा अर्थ सध्या वेगळ्या पद्धतीने काढला जातो. आता महापुरुष यांच्याबद्दल बोलायची भीती वाटायला लागली आहे. लोकांना की काही बोलताना चुकले तर ही टोळी आहे. थोर महापुरुषांना लहान बनवू नका ते महापुरूष महाराष्ट्राची वैभव आहेत. यांना राजकारणात आणू नका. महापुरुषांच्या नावाने राजकरण करू नका ना, तुम्ही तुमच्या लायकीवर आणि कर्तबगारीवर राजकरण करा, अस यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच त्यांनी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकर व्हायला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.