पुणे : पुण्यातील येरवडा परिसरामध्ये तसेच शहरातील मध्यवर्ती भागात गेल्या 30 वर्षापासून विनोद मोरे आणि त्यांचे कुटुंबीय गोळा व्यवसाय करत आहे. विनोद मोरे यांनी या गोळा दुकानाची रूप रेषा बदलून टाकली आहे. दुकानाकडे बघितल्यानंतर, हे दुकान नव्हे तर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची फोटो गॅलरी आहे की काय? असे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना वाटत आहे. गोळ्याच्या दुकानाच्या अवतीभोवती विनोद याने सचिन तेंडुलकर यांच्या संदर्भातील सर्वच फोटो तसेच त्यांनी सुरू केलेल्या भावी मुख्यमंत्री सचिन तेंडुलकर या जनमोहिमेत सहभाग घेतलेल्या ग्राहकांचे फोटो दुकानात लावण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या ग्राहकांना या मोहिमेबद्दल काय वाटत आहे? याबाबत त्यांनी एक डायरीदेखील ठेवली आहे.
'का' सुरू केली मोहीम : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला पाहायला मिळाले. 2019 च्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांना राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिले. त्यानंतर देखील मुख्यमंत्री पदासाठी युती तुटून शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर महाविकास आघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. अडीच वर्ष महाविकास आघाडीची सरकार असताना शिवसेनेचे शिलेदार मानले जाणारे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड पुकारले. 40 आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली. या राजकीय नाट्यात तसेच एकूणच राज्यात घडत असलेल्या या घडामोडीमध्ये जनतेने दिलेल्या मतांचा कोणतेच राजकीय पक्ष विचार करत नाही. त्यामुळे राज्यात एक स्वच्छ आणि राज्याचा विचार करणारा मुख्यमंत्री भविष्यात व्हावा, म्हणून विनोद मोरे यांनी पाच महिन्यांपूर्वी भावी मुख्यमंत्री म्हणून सचिन तेंडुलकर ही जनमोहीम सुरू केली.
ग्राहक मोहिमेत सहभागी : या मोहिमेबाबत म्हणताना विनोद मोरे म्हणाले की, मी जेव्हा माझ्या या दुकानाच्या अवतीभवती जेव्हा सचिन तेंडुलकर यांचे फोटो लावले. तसेच भावी मुख्यमंत्री म्हणून सचिन तेंडुलकर ही मोहीम सुरू केली. तेव्हा लोक माझ्याकडे बघून हसत होते. पण हळूहळू लोकांनाही लक्षात आले की, ज्या पद्धतीने सचिन तेंडुलकर यांनी क्रिकेटमध्ये कामगिरी करत देशाचा नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवत आहे. त्याच पद्धतीने राज्यात देखील सचिन तेंडुलकर हे मुख्यमंत्री झाल्यानंतर ते राज्याचा चेहरामोहरा बदलू शकतात. येणारे ग्राहक हे या मोहिमेबद्दल विचारू लागले. हळूहळू सहभागी देखील होऊ लागले. त्यांना देखील वाटू लागले की, स्वच्छ प्रतिमा तसेच राज्याला न्याय देण्याचे काम हे सचिन तेंडुलकरच करू शकतात. म्हणून ते या मोहिमेत सहभागी होत गेले. पाहता पाहता या पाच महिन्यात जवळपास दीड हजारावर लोकांनी फोटो काढत मोहिमेत सहभागी झाले. सचिन तेंडुलकरच भावी मुख्यमंत्री व्हावे, अशी डायरीत नोंद करू लागले.
मोहिमेसाठी दुकानाचे नाव बदलले : मोहिमेबाबत मोरे सांगू लागले की, आज पुणे शहरात मानसी मलाई गोळा म्हणून आमचे दुकान खूपच प्रसिद्ध होते. आमच्या या गोळ्याचे नावदेखील झाले होते. शहरातील कानाकोपऱ्यातून लोक आमच्याकडे गोळा खाण्यासाठी येत असतात. 50 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच गोळा आमच्या दुकानात विक्री साठी उपलब्ध आहे, असे असताना या जनमोहिमेसाठी आम्ही आमच्या दुकानाच नाव बदलले. सचिन मलाई गोळा हे नाव दिले असल्याचे यावेळी मोरे यांनी सांगितले.
सचिनला भेटायचे आहे : मी जेव्हापासून क्रिकेट बघत आहे. तेव्हापासून सचिन तेंडुलकर यांचा फॅन आहे. त्यांच्या मॅचसाठी मी दुकानात टिव्ही देखील लावला होता. पण जेव्हा राज्याच्या राजकारणात अशा पद्धतीने बदल होऊ लागले आहे. तेव्हा मला वाटले की, जसे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांनी आपल्या देशाचे नाव केले आहे. तसेच त्यांनी राजकारणात येऊन राज्याचे नाव देशाच्या पातळीवर न्यावे. मी कधीच त्यांना भेटलो देखील नाही. पण या मोहिमेसाठी माझी इच्छा आहे की, मी त्यांना भेटावे. एकदा भेटून त्यांना कसे मुख्यमंत्री करता येईल, यासाठी माझ्या डोक्यात असलेल्या प्लॅनबाबत त्यांना सांगावे, असे देखील यावेळी मोरे म्हणाले.