पुणे - पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारात उमेदवार गुंतलेले असताना शनिवारी खबळबळ उडवणारी घटना घडली. मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. रुपाली पाटील यांना साताऱ्यातील एका व्यक्तीने फोनवरून धमकी दिली आहे. याप्रकरणी रुपाली पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
फोनवरुन धमकी
राज्यभरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमधून उमेदवार निवडून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. सर्वच मतदारसंघात प्रचारही रंगू लागला आहे. पुण्यातही पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, या जागेच्या निकालाकडेही सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. या मतदारसंघातून भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख, महाविकास आघाडीकडून अरुण लाड, तर मनसेकडून माजी नगरसेविका रूपाली पाटील यांच्यासह 60 पेक्षा ज्यास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सातारा येथील लबाडे आडनाव असलेल्या व्यक्तीने पाटील यांना धमकी दिली आहे. आरोपीने फोन करून ‘तू जिथे असशील तिथे संपवू टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस,’ अशी धमकी दिली आहे. या धमकीच्या फोननंतर रूपाली पाटील यांनी पोलिसांत धाव घेत संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली आहे.
पुणे मतदारसंघ भाजपासाठी प्रतिष्ठेचा
पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात आहे. या मतदारसंघातून यापूर्वी दोनवेळा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आले आहेत. त्यामुळे भाजपाचे संग्रामसिंह देशमुख यांना निवडून आणण्यासाठी भाजपाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. तर याच दरम्यान पुण्यातील मनसेच्या माजी नगरसेविका रूपाली पाटील यांना सातारा येथून लबाडे या व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या धमकीच्या फोनमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.