जुन्नर (पुणे) - जुन्नर तालुक्यामध्ये जमिनीच्या कायदेशीर मोजणी पोलीस बंदोबस्तात सुरू असताना दोन माहिती अधिकार कार्यकर्त्यानी व्हिडीओ चित्रीकरण केले. त्यानंतर सोशल मिडिया साईट्स आणि यूट्यूबच्या माध्यमातून बदनामी करण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती समाजात पसरली. त्यानंतर सदर व्यक्तीकडून एक लाखाची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नारायणगाव पोलिसांनी या दोन्ही माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. संदीप पांडुरंग उतरडे (30) आणि सचिन जाधव (32) असे खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांची नावे आहे.
हेही वाचा - अवघ्या पंधरा दिवसाच्या वासराला अमानुष मारहाण; मालकावर गुन्हा दाखल
सचिन कृष्णाचंद्र ठाकूर (28) यांच्या फिर्यादीनुसार, सचिन ठाकूर यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनीची कायदेशीर मोजणी पोलीस बंदोबस्तात सुरू होती. मात्र, खंडणी मागणाऱ्या दोन्ही आरोपींनी सत्यता न पडताळता ठाकूर यांनी जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी पोलीस व महसूल अधिकाऱ्यांची बेकायदेशीर मदत घेतली. तसेच, त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे व्हिडिओ चित्रीकरण करून समाज माधमांवर प्रसारित केले. तसेच त्यानंतर ठाकूर यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यातील 25 हजार रुपये संदीप उतरडे आणि सचिन जाधव यांनी घेतल्याची तक्रार सचिन ठाकूर यांनी नारायणगाव पोलिसांत केली. त्यानुसार नारायणगाव पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.