पुणे Rohit Pawar : पुण्याच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर क्रिकेट विश्वचषकाचे ५ सामने होणार आहेत. यापैकी पहिला सामना १९ ऑक्टोबरला भारत आणि बांग्लादेश यांच्यात झाला. मात्र हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर आलेल्या प्रेक्षकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. यावर आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी आपलं मौन सोडलं आहे.
काय म्हणाले रोहित पवार : सोमवारी (२३ ऑक्टोबर) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार बोलत होते. 'आयसीसीनं दिलेल्या सूचनेनुसार आम्ही प्रेक्षकांना सोडत होतो. त्यामुळे काही वेळ गर्दी पाहायला मिळाली. प्रेक्षकांच्या ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या, त्याची पुनरावृत्ती पुढील चार सामन्यात होणार नाही. सर्व तक्रारींचा विचार करून, प्रेक्षकांना पुढील सामन्यात चांगल्या सोयी-सुविधा मिळतील', असं आश्वासन रोहित पवार यांनी दिलं आहे.
खेळाडूंच्या नव्या पोशाखाची घोषणा : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे (MCA) यावेळी २०२३-२४ वर्षासाठी खेळाडूंच्या नव्या पोशाखाची घोषणा केली. यासाठी एमसीएनं पुनित बालन समूह आणि ऑक्सिरिच यांची मुख्य भागीदार म्हणून निवड केल्याचं जाहीर केलं. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा करताना सांगितलं की, हा करार पाच वर्षांसाठी करण्यात आला असून याद्वारे संघटनेला पुनित बालन ग्रुप व ऑक्सिरिचकडून दरवर्षी ५ कोटी रुपये मिळतील. यानंतर आता महाराष्ट्राच्या रणजी संघासह सर्व वयोगटांमधील पुरुष व महिला संघांतील खेळाडूंच्या पोशाखावर समोरच्या बाजूला पुनित बालन ग्रुपचा लोगो दिसेल, तर बाहीवर ऑक्सिरिचचं चिन्ह असेल.
पुनित बालन ग्रुप आणि ऑक्सिरिचची निवड का : 'या करारामुळे महाराष्ट्रातील क्रिकेटसाठी पायाभूत व आधुनिक सुविधा तसेच खेळाडूंसाठी नव्या योजनांबरोबरच राज्यातील दुर्गम ठिकाणांतूनही गुणवत्ता शोध मोहीम राबविणं शक्य होईल', असं रोहित पवार यांनी सांगितलं. 'पुनित बालन ग्रुप आणि ऑक्सिरिच हे पुण्यातील आघाडीचे व्यवसाय समूह आहेत. त्यांनी विविध खेळांना तसेच अनेक खेळाडूंना पाठिंबा देत त्यांना साहाय्य केलं. त्यामुळेच महाराष्ट्रातील क्रिकेटचं उज्वल भवितव्य ध्यानात घेऊन या करारासाठी आम्ही त्यांची निवड केली', असं रोहित पवार यावेळी म्हणाले.
हेही वाचा :