पुणे - रक्षाबंधनाचा सण देशासह राज्यात साजरा होत असून यंदा या सणावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे सणाचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी विविध संस्था, संघटना, व्यक्ती सरकारी रुग्णालयात जाऊन हा सण साजरा करत आहे. पुण्यातील कोरोना योध्दे असणाऱ्या ससून रुग्णालयामधील महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितत आमदार रोहित पवार यांनी रक्षाबंधन सण साजरा केला.
![Rohit Pawar celebrated Rakshabandhan with Sassoon Hospital staff in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-rakshabandhan-rohitpawar-sasun-avb-mh10021_03082020134318_0308f_1596442398_250.jpg)
सध्याच्या परिस्थितीत या महिला रात्रंदिवस काम करत असून त्याच्याप्रती आदर व्यक्त करण्याकरता आलो आहे. तसेच भाऊ म्हणून त्यांना सँनिटायझर, मास्क ओवाळणी स्वरुपात दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. कोरोनाच्या संकटात हे कर्मचारी काम करत असून, त्यांच्या पगारवाढीच्या मागण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. विविध गोष्टी त्यांना लवकरच उपलब्ध करुन दिल्या जातील असेही रोहित पवार यांनी सांगितले.
![Rohit Pawar celebrated Rakshabandhan with Sassoon Hospital staff in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-rakshabandhan-rohitpawar-sasun-avb-mh10021_03082020134318_0308f_1596442398_319.jpg)
आमच्यासाठी आज अनोखा दिवस असून, प्रत्यक्ष रोहित पवार इथं येऊन आमच्याबरोबर रक्षाबंधन हा सण साजरा करत आहेत. आज पुन्हा आमचं मनोबल वाढलं आहे. पुण्यात आमच्या नर्स पॉझिटिव्ह होऊन बरे झाल्यानंतरही रुग्ण सेवा करत आहेत. हॉटेल्स, जेवण अशा विविध सुविधा आम्हाला देण्यात आल्या आहेत. यामुळेही आमचं मनोबल वाढलं असल्याचे मत येथील नर्सनी व्यक्त केले. यावेळी एका नर्सनी आमदार रोहित पवार यांच्यावर एक कविताही सादर केली.
![Rohit Pawar celebrated Rakshabandhan with Sassoon Hospital staff in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-rakshabandhan-rohitpawar-sasun-avb-mh10021_03082020134318_0308f_1596442398_848.jpg)