दौंड (पुणे) - तालुक्यातील खोर गावच्या हद्दीतील डोंबेवाडी येथे बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या तीन जेसीबी मशीन व सहा वाळू चाळण्याचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई महसूल विभाग व यवत पोलिसांनी संयुक्तरित्या केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल १ कोटी ८ लाख रुपये आहे, अशी माहिती यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
संतोष दिलीप डोंबे, दत्तात्रय डोंबे, सोमनाथ रघुनाथ डोंबे, विशाल किसन पिसे, सागर आनंता डोंबे, गणेश दत्तात्रय डोंबे (सर्व रा. खोर, ता दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून खोर व देऊळगाव गाडा रस्तालगत असलेल्या ओढ्यात स्थानिक वाळू माफियांनी जेसीबी मशीन व ट्रक्टरच्या सहाय्याने दिवसरात्र खुलेआम बेकायदा वाळू उपसा सुरू होता.
गुरुवारी ५ ऑक्टोबरला सायंकाळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा टाकला. यावेळी बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या तीन जेसीबी मशीन व सहा वाळू चाळण्याचे ट्रॅक्टर जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. याबाबत वरवंडचे मंडल अधिकारी महेश गायकवाड यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - पोलिसांनी पाठलाग करुन पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर, तिघांवर गुन्हा
मध्य प्रदेशात महाराष्ट्र पोलिसांची कारवाई -
अलिकडेच मध्य प्रदेशातील सौंसर वाळू खदानीतून वाळूची अवैध तस्करी करणाऱ्या टोळीला महाराष्ट्रातील वरुड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत वाळूचे 35 डंपर हस्तगत करण्यात आले आहेत. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या वर्धा नदीजवळ ही कारवाई केली.
अमरावती पोलीस अधीक्षक श्रीहरी बालाजी एन, उपविभागीय अधिकारी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनात आयपीएस अधिकारी श्रनिक लोध यांनी त्यांच्या 21 जणांच्या टीमने वर्धा नदीवरील चेक पोस्टवर पाळत ठेवून ही कारवाई केली. त्यांनी यावेळी 35 डंपरसह चार कार देखील जप्त केल्या.
हेही वाचा - महाराष्ट्र पोलिसांची वाळू तस्करांवर कारवाई, वाळूचे 35 डंपर ताब्यात