पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमानकारक विधान केल्यानंतर राज्यभर राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच राज्यपाल हटाव अशी मागणी देखील करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके (MLA Atul Benake) यांनी अशी मागणी केली आहे की, जर राज्यपालांची शिवजयंतीपर्यंत हकालपट्टी केली नाही तर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शिवनेरीवर येऊ देणार नाही. असा इशारा यावेळी बेनके यांनी दिला आहे.
आत्मक्लेश आंदोलन : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यावेळी सुनील टिंगरे, जयदेव गायकवाड, संदीप क्षीरसागर, अशोक पवार, अमोल मिटकरी, नितीन पवार, अतुल बेनके, रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
अमोल कोल्हे यांच्या अनुपस्थितीने राजकीय चर्चेला उधाण : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला स्थानिक खासदार अमोल कोल्हे हे अनुपस्थित असल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. यावर स्थानिक आमदार अतुल बेनके यांना विचारलं असता ते म्हणाले अमोल कोल्हे यांना पाठीचा आजार झाल्याने ते घरीच आहेत. हा कार्यक्रम अचानक ठरला असून कोणालाही इथ निमंत्रित केलं नव्हत. आम्ही देखील इथ आलो आहे. आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या बाबतीत जी चर्चा सुरू आहे ती चुकीची असून कोल्हे कुठेही जाणार नसल्याचं खुलासा देखील बेनके यांनी यावेळी केलं.