पुणे - बारामती उपविभागामध्ये दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. इंदापूर तालुक्यात काही ठिकाणी पाऊसही होत आहे. या वातावरणाचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ हवामान रोगांचा प्रादुर्भाव होण्यास पोषक असल्याने रब्बी हंगामातील पिके संकटात सापडली आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन -
पुढील तीन दिवस असे वातावरण कायम राहणार असल्याचे बारामती कृषी विज्ञान केंद्राने सांगितले आहे. सातत्याने होत असलेल्या हवामान बदलाचा परिणाम पिकांवर होत आहे. हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच कांदा पिकावर करपा, गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भाजीपाला पिकांनाही हवामान त्रासदायक ठरत आहे. एकूणच रब्बी हंगामातील पिकांना सध्याचे हवामान धोकादायक ठरत आहे. या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. पिकांची काळजी कशी घ्यावी, कीडरोगांना प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. पिकांच्या वाढीसाठी थंडी गरजेची आहे. ढगाळ वातावरण वाढल्यामुळे थंडी कमी झाली आहे.
द्राक्षबागांवर ‘डाऊनी’ रोगाचा प्रादुर्भाव वाढणार -
ढगाळ व दमट वातावरणामुळे द्राक्षबागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या वातारणात द्राक्षबागांवर ‘प्लझमोपॅरा व्हीटीकोला’ म्हणजेच ‘डाऊनी’ रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच डाळिंब बागांवर देखील बुरशीजन्य रोगाची शक्यता आहे. काही ठिकाणी द्राक्षांवर कमी-अधिक प्रमाणात डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. डाऊनीची लागण द्राक्ष बागांमध्ये पाने, फुले व घडावर होत असते.
बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढणार -
ढगाळ हवामानामुळे फळबागांवर बुरशीजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर, भाजीपाला आणि तृणधान्य पिकांववर तांबेरा रोग पडू शकतो. शेतकऱ्यांनी तातडीने फवारण्या करून रोगराईला आळा घालावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी केले आहे.