पुणे - कोरोनाच्या संकटात पुणे-मुंबई परिसरातून अनेक नागरिक हे आपल्या मूळ गावी येत आहेत. या नागरिकांना 14 दिवस गावातील शाळांमध्ये क्वारंटाईन केले जात आहे. त्यामुळे या शाळेच्या ज्ञानमंदिरात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांनी शाळेचा परिसर स्वच्छ करत नवा आदर्श घालून दिला आहे. शिरूर तालुक्यातील चांहोड शाळा परिसर पूर्णपणे स्वच्छ केला आहे. शाळेतील झाडांना नियमित पाणी घालणे, तसेच शाळेच्या भिंती स्वच्छ करणे ही कामे क्वारंटाईन कुटुंबे करत आहेत.
प्रत्येकाला आपलं गाव आणि गावची शाळा ही आदर्शच असते. सध्या कोरोनाच्या महामारीत नागरिकांना गावच्या शाळेच्या ज्ञानमंदीरात क्वारंटाईन व्हावे लागत आहेत. हे नागरिक शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ करत आहेत. या कामातून आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिक लढा देत आहे. या लढ्याला आता क्वारंटाईन असतानाही नागरिक स्वच्छतेच्या माध्यमातून साथ देत आहेत. तर गावातील व्यक्तींनी क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना अन्न-पाण्याची व्यवस्था केली आहे.