पिंपरी-चिंचवड - पुण्याच्या ऋतुराज गायकवाडची भारतीय क्रिकेट संघात श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली आहे. यामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. 'ऋतुराजला लहानपणापासूनच क्रिकेटची आवडत होती. तो तीन-चार वर्षांचा असतांना त्याला प्लास्टीकची बॅट, स्टंप घेऊन द्यायचो. तेव्हाच, तो उत्तम क्रिकेटर होऊ शकतो असे वाटले होते', असे मत ऋतुराजचे वडील दशरथ गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.
'उत्तम क्रिकेटर होईल असे वाटायचे'
ऋतुराजचे वडील दशरथ हे (डिआरडीओ) सुपर क्लासवन अधिकारी होते. ते काही महिन्यांपूर्वी निवृत्त झाले आहेत. ऋतुराजच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत वडील म्हणाले की, 'ऋतुराज लहान असताना त्याला बॉल, बॅट, स्टंप आणून द्यायचो. जेव्हा तो खेळायचा त्यावेळी चांगल्या पद्धतीने खेळत असल्याचे निदर्शनास आले. बॅटवरील पकड, धावणे, चपळता हे पाहून तो उत्तम क्रिकेटर होईल असे वाटायचे'.
'भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवून स्वतः ला सिद्ध केले'
ऋतुराजचे क्रिकेटबद्दलचे प्रेम पाहून 12 व्या वर्षी त्याला पिंपरी-चिंचवड शहरातील वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून दिला. तिथे तो क्रिकेटचे धडे घेऊ लागला. त्याला केवळ पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. असे वडील आवर्जून सांगतात. त्याच्या सरावात अडचण होईल असे काही आम्ही केले नाही. गावाकडे जाणे, तसेच इतर कार्यक्रम आम्ही टाळले. जेणेकरून त्याच्या सरावात अडचण येणार नाही. त्यानंतर ऋतुराज ने स्वतः ला सिद्ध करत मेहनत केली. आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र, त्याने भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवून स्वतः ला सिद्ध केले आहे.
'पाच वर्षात नाही घेतली एकही सुट्टी'
तर, प्रशिक्षक मोहन शंकर जाधव म्हणाले की, ऋतुराज हा अत्यंत शांत स्वभावाचा आहे. तो 12 व्या वर्षी वेंगसकर क्रिकेट अकॅडमीमध्ये दाखल झाला होता. त्याला क्रिकेटची प्रचंड आवड होती. 12 वर्षांपूर्वीच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल असे वाटले होते. क्रिकेट बद्दल ऋतुराज हा नेहमी आग्रही असायचा. पाच वर्षात एकही सुट्टी त्याने घेतली नव्हती, असे जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा - पुण्यात संततधार पाऊस, जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणी पातळीत अर्धा टीएमसी वाढ