पुणे - शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिळेकर नगरमध्ये शुक्रवारी रात्री तीन वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती. मात्र पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत अपहरणाच्या घटनेनंतर तीन तासांतच मुलीची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटकही केली आहे. मुलीच्या अपहरणा मागे काय हेतू होता, याचा तपास पोलीस करत आहेत. तर मुलीच्या पालकांनी मात्र वेगळी शंका उपस्थित केली आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार शनिवारी अमावस्या असल्याने यामागे काही अंधश्रद्धेचा प्रकार आहे का? अशी शंका येत आहे. मुलीची सुटका झाली तेव्हा तिला भंडारा लावण्यात आला होता, असे नातेवाईक सांगतात.
मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला कोंढवा पोलीसांनी रात्री १० वाजता अटक केली आहे. उमेश सासवे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
माधव शिंदे यांची मुलगी आराध्या हिचे अंगणात खेळत असताना अपहरण झाले होते. आरोपी हा टिळेकर नगरमधेच राहात असून त्याने मुलीला त्याच्या घरातच दुसऱ्यां मजल्यावर नेऊन ठेवले होते. कोंढवा पोलिसांच्या टिमने काही तासांत अपहरण झालेल्या मुलीची सुटका केली. घटनेवेळी आरोपी हा दारू पिलेला होता. मुलीला अपहरण करून रोडवरून जात असताना रस्त्यावरील काही तरुणांनी त्याला हटकले असता ही मुलगी माझी आहे, असे त्याने सांगितले होते. तसेच हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला होता. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, हा प्रकार अंधश्रद्धेशी तर संबंधित नाही ना, असी शंका पालकांनी उपस्थित केली आहे.