पुणे - पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे 30 जानेवारी रोजी एल्गार परिषद पार पडली. या एल्गार परिषदेत झालेल्या एका भाषणात शरजील उस्मानी या वक्त्याने, आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे, असे वक्तव्य केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला. भाजप नेत्यांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी सातत्याने लावून धरल्याने याप्रकरणी आता कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेत झालेल्या या भाषणाची चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा - राज्य सरकारने वीज बिल माफीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, राजू शेट्टी यांची मागणी
30 जानेवारी रोजी पार पडलेल्या एल्गार परिषदेत वक्ते शरजील उस्मानी याने भाषणादरम्यान, आजचा हिंदू समाज पूर्णपणे सडलेला आहे. 14 वर्षाच्या जुनेदला चालत्या ट्रेनमध्ये 31 वेळेस चाकूचे वार करून मारले जात असताना त्यांना कोणी थांबवत नाही. अशाप्रकारे लिंचींग करून हत्या करणारी ही लोक घरी जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्यात येऊन मिसळतात आणि आणखी दुसऱ्या कोणाची हत्या करतात, असे वक्तव्य केले होते. त्याच्या याच वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. तर, आमदार अतुल भातखळकर यांनीही एल्गार परिषदेच्या आडून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा आरोप केला आहे. तसेच, हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याप्रकरणी व देशद्रोही वक्तव्य केल्याप्रकरणी उस्मानीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी केली.
हेही वाचा - प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा