पुणे - मानाचा पहिला गणपती कसबा गणेशाचे साधेपणाने विसर्जन करण्यात आले. सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरवर्षी, मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला हार घालून कसबाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. मात्र, यंदा कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून बाप्पाचे विसर्जनही साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे कसबा गणपतीच्या मंदिरात बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्येच गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
सकाळी 11 वाजता पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ, कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत कसबा गणपतीची प्रतीकात्मक मिरवणूक काढण्यात आली. पाच ते दहा मिनिटांच्या मिरवणुकीनंतर मंडपातच तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदाजवळ बाप्पाची मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर आरती करून गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
दरवर्षी, विसर्जन मिरवणूक म्हटले की, संपूर्ण पुणे शहरात उत्साह असतो. पुण्यातील प्रमुख लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या मार्गांवर गणेशभक्तांची गर्दी असते. ढोल ताशांचा गजरात गणेशाला निरोप दिला जातो. मात्र, यंदा कोरोनामुळे हा उत्साह दिसून येत नाही. गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा बाप्पाचे विसर्जनही साध्या पद्धतीने होत आहे. शहरात विसर्जन मिरवणुकीला परवानगी नाही. त्यामुळे मानाच्या प्रमुख मंडळासह इतर मंडळांनीही मंडपातच विसर्जन हौद तयार केले आहेत. त्या हौदातच बाप्पाचे विसर्जन होत आहे.