पिंपरी चिंचवड ( पुणे ) - राज्यात मोठ्या प्रमाणात कोविड - १९ ची लाट पसरली आहे. कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध होत नाही. पुणे जिल्ह्यातील ही परिस्थिती निवारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात ऑक्सिनचा तुटवडा भासत असून येत्या दोन दिवसात ही परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होणार असून पिंपरी चिंचवडकरांनी घाबरून जाण्याची गरज नाही, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात सौरभ राव यांच्या उपस्थितीत महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका पदाधिकारी, आयुक्त यांची बैठक पार पडली.
पदाधिकाऱ्यांनी परिस्थिती मांडली
महापौर उषा ढोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातीत परिस्थिती राव यांच्यापुढे मांडली. शहरात कोविड - १९ प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्हा व ग्रामीण भागातील रुग्णांवर अत्यावश्यक उपचार करण्यात येत आहे. कोविड संसर्ग रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत याठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
'नागरिकांनी घाबरून जाऊ नये'
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, या सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन निर्णय घेत आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी वापरण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यात येईल. राज्यातील इतर जिल्ह्यातून ऑक्सिजनची मागणी वाढल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका व खाजगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असून काळजी करण्याची गरज नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सौरभ राव यांनी केले आहे.
हेही वाचा-भावासाठी केली ऑक्सिजनची तजवीज, पण अन्य रुग्णांची तडफड पाहून 'त्याने' सोडले प्राण