पुणे - 'बळीराजा जगला पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यामुळे काँग्रेसने आजवर शेतकऱ्यांना आणि कामगारांना मदत करणारे कायदेच केले. परंतु आता शेतकरी उद्ध्वस्त होत असतानाही भाजपा सरकार काही बोलण्यासाठी तयार नाही. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. भाजपा सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधले आहे. नव्याने मंजूर केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे,' अशी टीका पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.
हेही वाचा - हाथरसची घटना देशातील लोकशाहीला काळिमा फासणारी - छगन भुजबळ
पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पुणे शहर काँग्रेसतर्फे नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बागवे म्हणाले, 'काँग्रेसने आजवर शेतकऱ्यांना आणि कामगारांना फायदेशीर ठरणारे कायदे केले. परंतु भारतीय जनता पक्षाने केलेला हा कृषी कायदा शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या मुळावर येणारा आहे. भाजपा सरकारने लवकरात लवकर हा जुलमी कायदा मागे घेऊन शेतकरी आणि कामगारांच्या हिताचे कायदे करावेत. जोपर्यंत भाजपा सरकार हा कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करतच राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
हेही वाचा - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफांशी वाद झालेल्या डीवायएसपीला नागपुरात पदोन्नती