पुणे - कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे निदान करण्यासाठी भारतीय कंपनीने शोधलेल्या 'चाचणी किट'ला मान्यता मिळाली आहे. 'मॉलेक्युलर डायग्नोस्टिक'ची 'माय लॅब सोल्युशन प्राव्हेट लिमिटेड' या पुण्यातील कंपनीला हे यश आले आहे. कोविड 19 च्या तपासणीसाठी भारताने आतापर्यंत लाखो किट जर्मनीतून आयात केले आहेत. आता मात्र भारतातच तयार केलेल्या किटला मान्यता मिळाली आहे.
हेही वाचा - कोरोनाशी लढा देण्याकरता 'हीरो' करणार १०० कोटींची तरतूद
अवघ्या 6 आठवड्यात किट विकसित -
'माय लॅब पॅथोडिटेक्ट कोविड-19 क्वॉलेटेटीव्ह पीसीआर किट' असे किटचे नाव आहे. एफडीए, 'सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन'ची मान्यता मिळालेले हे पहिलेच किट आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि सीडीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे किट विकसित करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येक आठवड्यात एक ते दीड लाख किट निर्माण करण्याची कंपनीची क्षमता असल्याचे सांगण्यात येत आहे. किटची किंमत ही सध्या वापरत असलेल्या आयात किटपेक्षा खूप कमी म्हणजे आयात किट किमतीच्या 25 टक्के इतकीच आहे.