पुणे: जिल्ह्यातील, पुणे, तळेगाव दाभाडे (मावळ), जुन्नर, मंचर (आंबेगाव) भोर निरा ( पुरंदर ), खेड इंदापूर, दौंड आणि बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम हा साधारणपणे 27 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज छाननीचा 5 एप्रिल हा दिवस आहे. वैध अर्ज प्रसिद्धीचा 6 एप्रिलची तारीख आहे. 6 एप्रिल ते 20 एप्रिल अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. अंतिम यादी आणि चिन्ह वाटप 21 एप्रिलला, मतदान 28 एप्रिलला, मतमोजणी निकाल 29 एप्रिलला लागणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया : जिल्ह्यात दहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळीची रंगत आजपासून सुरू होणार आहे. कोरोनाची संकट आणि बाजार समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा, सर्वच बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. नागपूर खंडपीठाने बाजार समितीच्या निवडणुका घेण्यासंदर्भात आदेश दिले. त्यानुसार राज्यातील निवडणुकीस पात्र सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया 30 एप्रिल 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करण्यास अंतिम मुदत वाढ दिली होती. त्यानुसार पुण्यातील निवडणूक कार्यक्रमास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील, सचिव डॉ. पी. एल खंडागळे यांनी मान्यता दिली आहे.
निवडणुकांची लगबग सुरु: अनेक बाजार समितीच्या प्रशासकांचा कार्यभार संपणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी त्याचबरोबर गावगाड्यातले पुढारी त्यांचे सुद्धा समाधान होणार आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक हे काम करत आहेत. प्रशासकीय कामामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याची सातत्याने टीका होत असते. त्यामुळे आता या दहा कृषी उत्पन्न बाजार समितीचा गुलाल उधळणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने, पुणे जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमास मंजुरी देऊन, त्याचा कार्यक्रमही जाहीर केल्याने आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.
हेही वाचा: Corona Update पुणेकरांची चिंता वाढली पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच शहरात 460 रुग्ण