पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिला आहे. १ जून रोजी दिलेल्या निर्णयात न्यायालयाने त्यांना ४ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे त्यांना आज (मंगळवार) ४ जून रोजी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
सीबीआयच्या वतीने पुनाळेकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉप आणि मोबाईलमधील माहितीची पडताळणी करण्यासाठी पुनाळेकर आणि भावे यांच्या सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, सीबीआयच्या तपासात कोणतीही प्रगती झाली नसल्याचा दावा करून बचाव पक्षाच्या वतीने दोन्ही संशयितांच्या सीबीआय कोठडीचा विरोध करण्यात आला होता. न्यायालयाने बचाव पक्षाची मागणी मान्य करत दोन्ही संशयितांना न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.