पुणे - महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत स्थलांतरित मजुरांचे योगदान आहे. पण सद्या कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने स्थलांतरित मजूर त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. मात्र, वाहतुकीची साधने नसल्याने रस्त्याने पायी जाणारे जथ्थे दिसतात. ही बाब महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यास भूषणावह नाही. मजुरांना ज्याप्रकारे वागवण्यात येत आहे, ही घोडचूक असून त्यांना घरी पाठवण्यासाठी पैसे वाचवण्याचा प्रकार चुकीचा आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.
पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग चर्चासत्रात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. ते म्हणाले, 'महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मजुरांचे योगदान असून राज्यात काम करणारी ही यंत्रणा मोडकळीस येता कामा नये. पुढील काळात एमआयडीसीजवळ वसाहती निर्माण करून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली पाहिजे.'
राज्यातील प्रत्येक विभागात पाच लाख लोकसंख्येपर्यंतची औद्योगिक शहर विकसित करण्याची आवश्यकता आहे. परंतु सध्याच्या नेतृत्वाकडे कल्पकतेची कमतरता दिसून येते. परराज्यातील १० वरिष्ठ आयएएस अधिकारी कामाविना बसून आहेत. तर काही अधिकाऱ्यांकडे दोन-दोन खात्याची जबाबदारी आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांची योग्य ठिकाणी निवड करण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे असल्याचेही चव्हाण यांनी सांगितलं.
केवळ सचिवांना दोष देऊन चालणार नाही. तर राज्यकर्त्यांनीही बदल करणे अपेक्षित आहे. यापुढील काळात महाराष्ट्रासमोर आर्थिक आव्हान उभे राहणार असून त्यासाठी दूरदर्शी नेतृत्वाची गरज असल्याचेही चव्हाण यांनी पुढे बोलताना सांगितले.
हेही वाचा - पुणे, मुंबई परिसरात नागरिक मोठ्या संख्येने खेड तालुक्यात दाखल; कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती
हेही वाचा -#कोरोना 'पॉझिटिव्ह' : पुण्यात 81 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात; 30 वर्षीय तरुणालाही डिस्चार्ज